Categories
Story

भेट माझी तुझी

“कचराळी, असला कुठला तलाव असतो का?” हसत हसत अमोदी  म्हणाली. “अगं आहे, बघितले नाहीस तर कळणार कसं ?” तिला समजावत रेणू म्हणाली. नवीन शहरात नवीन काही काही पाहू, ह्या विचाराने ती दुपारची साखरझोपेतून उठली आणि running shoes घालून तयार झाली. काहीशी कुरकुरत होतीच मनात – बाबांची बदली नेमकी ठाण्यालाच व्हायला हवी होती का ..नावही विचित्र आणि त्यातले ते तलाव पण ..मासुंदा काय, तलावपाळी काय आता हा अजून एक …कचराळी … मात्र तलावावर गेल्यावर तिची कळी खुलली, मध्ये तलाव आणि सभोवती सुंदर झाडे. छान हिरवागार परिसर आणि तिच्या लाडक्या गणपतीबाप्पाचे देऊळ. त्यामुळे तिला तो जास्त आवडला. किमान १ किलोमीटरचा तरी ट्रॅक असेल, असा अंदाज घेत तिने रोज सकाळीच इकडे यायचे आणि भरपूर running करायचे, असे ठरवूनच टाकलें. रेणू सोबत होतीच . हळूहळू तिला हा तलाव न सकाळचा व्यायाम इतका सवयीचा झाला कि नाही गेले तर चुकल्यासारखे वाटू लागले.

एकदा रेणू दिवाळीच्या सुट्टीला गावी गेली मग काय एकटेच जाऊ ह्या विचाराने ती बाहेर पडली आणि चालू लागली ..सकाळची शांतता आणि रहदारीपण नाही हे पाहून “हीच ती वेळ हाच तो क्षण ” हा विचार करत तिने धावायला सुरुवात केली पण तिला माहिती नव्हते की भटक्या कुत्र्यांनीही फिरायची हीच ती वेळ असते !  मग काय ती पुढे आणि श्वानपथक मागे अशी स्थिती झाली!

शेवटी ती एका बिल्डिंग मध्ये शिरली आणि सुटका करून घेतली. ती धापा टाकत होती तेव्हा तिच्या लक्षात आले की एक hoodie वाला मुलगा खो खो हसत आहे आपल्याला पाहून, ती इतकी रागावली की काय बोलावे सुचेना  “हसायला काय जाते, एवढीच माणुसकी असती तर कुत्र्यांना हाकलून द्यायला मदत केली असतीत. मुंबईच्या माणसांकडून काय अपेक्षा म्हणा, घड्याळाच्या काट्याकडे बघून पळणारी माणसं! ” तो तसाच ढीम्म उभा, कारण कानात गाणी गुणगुणत असताना काय ऐकू येणार? तिचा रागाचा पारा अजून चढला, ती रागारागाने निघून जाऊ लागली. मग मात्र तो बोलला “इतकाच बचाव करायचा होता तर एक दगड मारायचा होता कुत्र्यांना – गेली असती शेपुट घालून – मुंबईकरांचा उद्धार कशाला करायचा.” “तुमच्या अंगावर आले ना की कळेल” असे म्हणत ती तिकडून निघाली, अनोळखी माणसाच्या नादी कशाला लागायचे. कॉलेज आणि classes, submissions  च्या धावपळीत ती हा सारा प्रसंग विसरून गेली.

दुसऱ्या दिवशी तिने पहिले तो hoodie वालाही आला आहे तळ्यावर. भर मार्च महिन्याच्या उन्हाळ्यात हा असा नायके चा मोठा टिकमार्क स्टाईल मारायला घालून आला असेल. जाऊ दे, आपण का इतके लक्ष देतोय! रोजच तोही तिकडे असायचाच. एकदा तिने पाहिले, त्याच्या खिशातून काहीतरी चमकणारी वस्तू पडली आणि त्याचे लक्षही नव्हते! तिने पट्कन जाऊन पाहिले तर मोबाईल! ह्याचे नावही माहिती नाही न तो जॉगिंग करत पुढे पळत चाललेला. अमोदी त्याच्या मागे निघाली पण तो आणखीन वेगात धावत होता. शेवटी “ओ hoodie वाले तुमचा मोबाईल” अशीच हाक मारली न तो थबकला आणि परत तिच्याकडे आला. “शनय महाजन असं पण म्हणू शकता – पण hoodie वाले हे नाव funky आहे” असं म्हणत तो पुन्हा हसू लागला. मी गंभीरपणे ह्याची महत्त्वाची वस्तू देतेय पण ह्याला जोकेचं जास्त पडलेलं आहे, असा विचार करून ती आणखीनच रागावली पण काहीच बोलली नाही. हा तुमचा मोबाईल, असे म्हणत त्याच्या हातात तो देत जाऊ लागली. “थँक यू , देशपांडेबाई ” असे तो म्हणल्यावर तिने लगेच  मी देशपांडे नाही आणि बाई वगैरे outdated संबोधन काय वापरता ? मी अमोदी दाते . शेवटी “Thank you  अमोदी आणि सॉरी, मी मजा केली तुमची!” अशी माफी मागत शनय निघून गेला.

आज पहिल्यांदाच तिने त्याचा चेहरा पहिला, छानच व्यक्तिमत्व आहे त्याचं – सावळा पण सतेज वर्ण आणि पाणीदार हसरे  डोळे. “हा नक्कीच जिम ला जात असेल, काय muscles आहेत आणि काय मस्त मिशी आहे” इति रेणू ! “काहीतरीच तुझं आपलं – आपटे  सरांनी assignment दिलीये ती पहिली का, मग सगळं विसरशील” असं म्हणत तिने रेणूला दामटवलं. “काय डॅशिंग मुलगी होती ती, स्मार्ट गर्ल ! दिसतेही छान – तिचे ते टपोरे घारे डोळे!” अशी शनयची अवस्था होती. रोजच तळ्यावर भेट होऊ लागली आधी “hi – hello” म्हणता म्हणता त्यांची मैत्री कधी झाली कळले पण नाही.

शनय सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि फ्रीलान्स काम करत होता. स्वतःची कंपनी स्थापन करायची त्याची इच्छा होती. Web Development, Designing हे अमोदीचे आवडीचे विषय. त्यामुळे त्याच्याशी मैत्री व्हायला हे कारण पुरेसे होतेच. आधी रेणू सोबत असताना आणि मग ती नसतानाही गप्पा होऊ लागल्या. कधी संध्याकाळी भेटणे होऊ लागले आणि भेटण्याचे ठिकाणही तेच – कचराळी तळे.

माझे हे आवडते गाणे आहे “चांदण्यात फिरताना माझा धरलास हात “ हे गाणे त्याने ऐकवले होते. पौर्णिमेची संध्याकाळ, तो मंद चंद्रप्रकाश आणि हे गाणे काय रोमँटिक वाटले तिला आणि मनातल्या मनात ती लाजली! मला झुंबा क्लासमध्ये एड शेरानचं  “Shape of you” चा गाणं माझं सगळ्यात आवडतं आहे असं म्हणत ती उठली. मग तो सुद्धा असेच काहीतरी जिम मधले किस्से सांगू लागला आणि विषयच बदलला. गप्पांच्या ओघात ८ कधी वाजले हे कळलं पण नाही त्यांना!

लवकर घरी जायच्या नादात उद्यापासून सबमिशन मग Preparation leave आणि फायनल सेमिस्टरची परीक्षा असे दोन महिने फारच busy जातील; हे ही त्याला सांगायचे राहून गेले. त्याचा फोन नंबर घ्यावा का; असेही तिला वाटले पण आगाऊपणा वाटेल म्हणून विचारलेच नाही तिने. शनयही निघताना तोच विचार करत होता, विचारावं का तिला, चांगली मैत्रीण तर झाली आहे ती; नकोच पण – उगाच रागावली तर? त्याला bye  म्हणून पट्कन ती निघाली. ह्या वेळेस फारच सिरिअसली अभ्यास करून चांगलं GPA मिळवायचे, हाच विचार करून ती कामाला लागली.

ह्या सगळ्या गडबडीत तिला मधूनच शनयच्या गंमतीशीर गोष्टी आठवायच्या. एक मोठी मांजर आली म्हणून कुत्रे आनंदाने मागे धावू लागले; असे त्या प्रसंगाचे तो वर्णन करायचा. त्याला साथ द्यायला रेणूही खो – खो हसायची. मग ही लटका राग दाखवून म्हणायची – हे सगळं पाहून एक मोठा बोका दात दाखवून हसतच होता! कोणाची मदत करावी, हे त्याच्या गावीही नव्हते. असे एकमेकांच्या खोड्या काढल्याशिवाय संवाद पूर्ण व्हायचा नाहीच. किती शांत वाटत आहे तो नाही भेटला तर! अमोदीने मनाशी विचार केला. Running पार्टनर असलेला हा शनय मित्र कधी झाला ते कळलेच नाही… त्याचा एवढा आपण विचार करतोय, त्याला काय वाटत असेल आपल्याबद्दल. असे वेगळ्या दिशेने जाणारे आपले विचार झटकत ती पुन्हा अभ्यासात गर्क झाली.

“ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा, कोऱ्या कागदाची कविता अन जशी व्हावी तशी तू हलके बोल ना ” गाणं बघताना अमोदीच दिसू लागली. “छे हे काय, फिल्मीच झालं. ती मला आवडते हे मात्र खरं.” असा विचार करत तो झोपी गेला.दुसऱ्याच दिवशी त्याला काही महिन्यांकरता US ला ट्रैनिंग करता client पाठवणार असल्याचं कळलं. मग Visa ची तयारी, स्टॅम्पिंग आणि लगेचच business ट्रिप; ह्यामुळे तो फारच घाईगडबडीत होता ते पार flight पकडेपर्यंत. त्याला आठवले अमोदीचा निरोपच घेता आला नाही – तिचा ई-मेल id पण नाही आपण घेतला…किती मिस करतोय तिला..Social media वर सुद्धा शोधले पण ती कुठेच नाहीये – आपल्यासारखेच hidden अकाउंट असेल – कोणालाच न सापडण्यासारखे…आता परत येईपर्यंत वाट पाहणे.. असे विचार करत असतानाच विमान take ऑफ झाले.

म्हणता – म्हणता २ महिने पट्कन संपले. आता फायनल सेमिस्टर झाली एकदाची – ह्या आनंदात अमोदी आणि रेणूने तलावपाळीवर जाऊन पाणीपुरी आणि आईस्क्रीमची पार्टी केली. आता महिना – दोन महिने निकालाची वाट पाहणे आणि जॉब search करणे. फावल्या वेळात time pass करणार होत्याच. मुंबईत फिरायचे, लिंकिंग रोडला स्ट्रीट शॉपिंग, बॅण्डस्टॅण्डला ग्रुप सोबत जायचे, सिनेमा – नाटकं पाहायचे काय काय बेत होते त्यांचे! आणि हो रेणू गावी पण जाणार होती. अमोदीला आग्रह करून सुद्धा ती काही गेली नाही रेणू सोबत कारण पुण्याला मावशीकडे जाणे तेव्हाच ठरले ना. जूनच्या शेवटच्या आठवड्यातला तो मुंबईचा पाऊस आणि मग पुण्याला जाताना लोणावळ्याला दिसणारे सुंदर धबधबे पाहून ती हरखून गेली. पुण्यात सिंहगडावर फिरणे त्या पावसाळी हवेत किती आल्हाददायी होते!

शनय इकडे हवा होता असे तिला वाटले, अजून मज्जा आली असती! पण काय येडेपणा केला आपण, कॉन्टॅक्ट नंबर मागितला असता तर निदान व्हाट्सअँप वर chatting तरी  केले असते! जाऊ दे, आता ठाण्याला गेलो की भेटूया त्याला. “काय खयालो – खयालो में हसतेयस” असं मावशीच्या बोलण्याने ती भानावर आली ती.एक विनोद आठवला, म्हणून असे म्हणत तिने काहीतरी हत्ती आणि मुंगीचा PJ मावशीला सांगितला. भरपूर दिवस पुण्याला राहून ती परत ठाण्याला आली.

अग एक दिवस आराम कर, अशा आईच्या म्हणण्याकडे कानाडोळा करत दुसऱ्याच दिवशी कचराळी तलावावर जॉगिंगला गेली. नजर मात्र शनयला शोधत होती. रेणू म्हणाली पण – काय शोधतेस, मिशीवाला का. तर हिने तिला झटकून लावले. नाही नाही मी असेच बघत होते, ते एक आजोबा नेहमी दिसायचे ह्या वेळेस ते दिसत नाहीयेत .. रेणू हेच म्हणाली – मांजर डोळे मिटून दूध प्यायली म्हणून लोकांना दिसत नाही असं नाही..

तो दिसला नाही म्हणून ती नाराज झाली पण तो भेटला तर इथेच भेटेल, ह्या विचाराने ती जरा सुखावली. असेच दिवसामागून दिवस गेले, परिक्षेचा निकालही लागला पण शनय दिसलाच नाही कुठे. तळ्यावर येताना तिला तो आज तरी भेटेल असे वाटे पण नाहीच व्हायचे असे. मग काय रेणूलाही ते जाणवले. Hoodie घालून हसत सुटलेला पहिल्या भेटीतला तो ते “चांदण्यात फिरताना”ऐकवताना तिच्या डोळ्यात पाहणारा तो, अशा खूप आठवणी यायच्या पण कुठे शोधणार त्याला?

त्या दिवशी गणेश चतुर्थी म्हणून संध्याकाळी नवीन ड्रेस घालून आणि छान तयार होऊन ती गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला तळ्यावर आली. पण अचानक पावसाची काहीच चिन्हे नसताना वारा वाहू लागला आणि तिचे मोकळे केस उडवले आणि दुपट्टाही उडवला.पाऊसही जोरात सुरु झाला.  नेमकं आजच्याच दिवशी हा पाऊस यायला पाहिजे होता  का, असे म्हणत ती भिजतच मंदिराच्या परिसरात गेली आणि shade मध्ये थांबू म्हणून थांबली पण कोणाच्या तरी धक्क्याने ती पडायच्या बेतात होती पण तिचा हात धरून कोणीतरी सावरले, खूपच मजबूत पकड होती त्याची! “अहो देशपांडेबाई, जरा सांभाळून” तिने आश्चर्यचकित होऊन पहिले – तो शनयच होता. मग मात्र नजरानजर झाल्यावर ती जे गोड लाजली, असे पाहून तो गालातल्या गालात हसला. एका मनातील गुपित दुसऱ्या मनाला कळलं होतं !

Image reference: http://www.google.com

© All rights reserved. Tanaya’s Blog.

Image courtesy: http://www.bing.com

One reply on “भेट माझी तुझी”

Leave a comment